एनएसईद्वारे सोशल स्टॉक एक्सचेंजची (एसएसई) स्वतंत्र विभाग म्हणून स्थापना होणार

126

पुणे, २३ डिसेंबर २०२२ : नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडियाला (एनएसई) १९ डिसेंबर २०२२ रोजी सिक्युरिटीज एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियातर्फे (सेबी) एनएसईचा स्वतंत्र विभाग म्हणून सोशल स्टॉक एक्सचेंज (एसएसई) स्थापन करण्याची परवानगी मिळाली आहे.

माननीय वित्त मंत्री श्रीमती निर्मला सीतारामन यांनी यापूर्वी २०१९- २० चे अर्थसंकल्पीय भाषण करताना सिक्युरिटीज एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियाअंतर्गत (सेबी) सोशल स्टॉक एक्सचेंजच्या निर्मितीचा प्रस्ताव मांडला होता. सामाजिक कल्याणासाठी झटणारे सामाजिक उद्योग आणि स्वयंसेवी संस्थांच्या नोंदणीसाठी अशाप्रकारचे स्वतंत्र एक्सचेंज असल्यास त्यांना इक्विटी, डेटसारखे भांडवल किंवा म्युच्युल फंड्ससारखे युनिट्स उभारणीसाठी मदत होईल असेही त्या म्हणाल्या होत्या.

भारत सरकारने राजपत्र अधिसूचनेद्वारे सिक्युरिटीज कॉन्ट्रॅक्ट्स (रेग्युलेशन) कायदा १९५६ अंतर्गत ‘झिरो कुपन झिरो प्रिन्सिपल (झेडसीझेडपी)’ नवी सिक्युरिटी जाहीर केली होती. नवे झेडसीझेडपी साधन एनएसईच्या सोशल स्टॉक एक्सचेंजवर नोंदणी केलेल्या नॉट फॉर प्रॉफिट (एनओपी) संस्थांना पात्रता निकष पूर्ण करून निधी उभारणीसाठी सार्वजनिक किंवा खासगी पातळीवर विक्री करता येऊ शकेल. सध्याच्या नियमावलीनुसार विक्रीचा आकार किमान एक कोटी रुपये असावा आणि सबस्क्रिप्शनसाठी किमान अर्जाचा आकार २ लाख रुपये असावा. झेडसीझेडपीचे सबस्क्रिप्शन सामाजिक देणगीसारखे असेल.

एनएसईचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. आशिषकुमार चौहान म्हणाले, ‘एनएसईने कायमच देशाच्या भांडवल उभारणीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावलेली आहे. आम्ही एनएसईचा स्वतंत्र विभाग म्हणून सोशल स्टॉक एक्सचेंज लाँच करत आहोत. या व्यासपीठामुळे सामाजिक उद्योगांना शाश्वत विकास ध्येयांसाठी योगदान देण्यास मोठा फायदा होईल असे आम्हाला वाटते.’