ऊर्जेची बचत, शाश्वत विकास व पर्यावरण संवर्धनासाठी २४ एप्रिल ते ८ मे २०२३ दरम्यान ‘सक्षम २०२३’ महोत्सव

44
'Saksha 2023' festival from 24 April to 8 May 2023 for energy conservation, sustainable development and environment conservation
पुणे : “ऊर्जेची बचत, शाश्वत विकास आणि पर्यावरण संवर्धनासाठी ‘सक्षम-२०२३ (संरक्षण क्षमता महोत्सव) हा एक महत्वाचा राष्ट्रीय कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. केंद्रीय पेट्रोलियम व नैसर्गिक वायू मंत्रालयाच्या पुढाकारातून २४ एप्रिल २०२३ ते ८ मे २०२३ या कालावधीत ‘नेट झिरो’ संकल्पनेवर हा पंधरवडा देशभर साजरा करण्यात येत आहे. राज्यामध्ये ‘सक्षम २०२३’चे उद्घाटन २४ एप्रिल २०२३ रोजी सार्वजनिक बांधकाम व ग्राहक संरक्षण मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते होणार आहे,” अशी माहिती हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडच्या पुणे विभागाचे विपणन अधिकारी गौरव अग्रवाल यांनी दिली.
एचपीसीएल पुणे रिजनल ऑफिसमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेवेळी हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडच्या पुणे विभागाचे विपणन अधिकारी यशपाल चौकी, मनुष्यबळ अधिकारी घनश्याम गायकवाड, पेट्रोल व डिझेल डीलर्स असोसिएशनचे राष्ट्रीय प्रवक्ते अली दारूवाला आदी उपस्थित होते.
गौरव अग्रवाल म्हणाले, “जीवाश्म इंधनावरील खर्चाला आळा घालणे, परकीय तिजोरीवरील वाढते ओझे कमी करणे आणि जीवाश्म इंधनाच्या ज्वलनामुळे निर्माण झालेल्या हरितगृह वायूच्या प्रतिकूल परिणामापासून पर्यावरणाचे रक्षण करणे हे या कार्यक्रमाचे अंतिम लक्ष्य आहे. केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालय, तसेच तेल उद्योगाचे राज्यस्तरीय समन्वयक यांच्यामार्फत ही जनजागृती केली जात असून, यामध्ये राज्य सरकारचा सक्रिय सहभागाने आहे. पेट्रोलियम संवर्धन संशोधन संघटना (पीसीआरए) पेट्रोलियम उत्पादनांच्या संवर्धनाची जनजागृती करण्यासाठी, इंधन-कार्यक्षम उपकरणांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि पेट्रोलियम संवर्धनाचे धोरण आणि रणनीतीचा प्रस्ताव ठेऊन, सरकारता मदत करण्यासाठी अग्रणीय आहे.”
“या पंढरवाड्यामध्ये तेल कंपन्यांनी आयोजित केलेल्या रांगोळी आणि तेल संवर्धनावर विद्यार्थ्यांनी केलेली लघुनाटिका पाहता येणार आहे. शालेय विद्यार्थ्यांसाठी समूह संभाषण, वादविवाद, कॉलेजमध्ये भित्तिचित्रे स्पर्धा, इंधन कार्यक्षम ड्रायव्हिंग स्पर्धा, लेख लेखन, रेडिओवरील जिंगल्स जनजागृतीसाठी प्रसारित होतील. सक्षम-२०२३ अंतर्गत राज्यात विविध प्रकारच्या १००० पेक्षा जास्त कार्यक्रमांचे आयोजन होणार आहे. इंधन आणि तेल संवर्धनासाठी शालेय विद्यार्थी आणि शिक्षकांचा त्यांच्या उत्कृष्ट योगदानाबद्दल सत्कार करण्यात येईल,” असे यशपाल चौकी यांनी नमूद केले.