पुणे : “उरी’ पहा आणि भाजपचे सदस्य व्हा’ असा फंडा भाजपच्या शहराध्यक्षांनी शुक्रवारी शहरात राबवला. “कारगील शौर्य दिना’निमित्ताने राज्यसरकारने राबवलेल्या “उरी’ चित्रपट दाखवण्याच्या उपक्रमाचा फायदा घेत ही सदस्यनोंदणीची शक्कल त्यांनी शुक्रवारी शहरात लढवली.
“उरी’ चित्रपट फुकट दाखवण्याच्या निमित्ताने कॉलेजवयीन तरुणांना चित्रपटगृहापर्यंत आणले आणि त्याचे मार्केटिंग करून सदस्यनोंदणी अभियान राबवण्यात आले.
सध्या भाजपचे देशभर सदस्यनोंदणी अभियान सुरू आहे.
भाजपचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष आणि पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी नव्याने सव्वाकोटी सदस्य नोंदीचे उद्दीष्ट ठेवले आहे. त्यामुळे प्रत्येक जिल्ह्याला, शहराला “टार्गेट’ देण्यात आले आहे. त्यामुळे ही सदस्यनोंदणी करण्यासाठी शहराध्यक्षांनी “कारगील शौर्य दिना’चे औचित्य साधले.
शहरातील सुमारे 14 चित्रपटगृहात हा चित्रपट भाजपतर्फे मोफत दाखवण्यात आला. शहरातील प्रत्येक महाविद्यालयात त्याचे प्रती महाविद्यालय 100 पास वाटण्यात आले. पास मिळालेले विद्यार्थी चित्रपट पाहून आले, की त्यांची भाजपचे सदस्य म्हणून मोबाइल क्रमांकावर “मिस्डकॉल’ द्यायला लावून नोंदणी करून घेतली जात होती.
त्यामुळे चित्रपटाच्या बदल्यात भाजपचा सदस्य करून घेण्याच्या या फंड्याची चर्चा विद्यार्थ्यांमध्ये दिवसभर सुरू होती. “कोणीही फुकट कोणतीही गोष्ट देत नाही, देशभक्तीही दाखवली मात्र त्याचे मोल सदस्यत्त्वाच्या रूपाने घेतले,’ अशी प्रतिक्रिया काही विद्यार्थ्यांनी या निमित्ताने व्यक्त केली.