वडोदरा, ऑगस्ट, २०२३ : भारतातील मोटरस्पोर्ट्स क्षेत्राची पुनर्व्याख्या करण्याच्या आपल्या योजनेनुसार, ‘सीएट इंडियन सुपरक्रॉस रेसिंग लीग‘ने लीगच्या फ्रँचायझी संघांपैकी एक म्हणून “गुजरात ट्रेलब्लेझर्स” या संघाचा समावेश आगामी हंगामात करण्याचे ठरविले आहे. लीगतर्फे आज ही घोषणा करण्यात आली. लीगच्या प्रवासात महत्त्वाचा टप्पा असणारा हा संघ वडोदरास्थित उद्योजक ध्रुमिल पटेल आणि भारतीय मोटरस्पोर्टमधील दिग्गज गौरव गिल यांच्या मालकीचा असेल.
ध्रुमिल पटेल यांनी आपल्या व्यवसायाच्या संपूर्ण कारकिर्दीमध्ये वैविध्यपूर्ण कामगिरी बजावलेली आहे. कोणत्याही गोष्टीत उत्कृष्टतेसाठी त्यांचा नेहमीच आग्रह असतो. बिट्स पिलानी, पर्ड्यू युनिव्हर्सिटी आणि हार्वर्ड येथून शिक्षण घेतलेले पटेल यांनी रिअल इस्टेट, हेवी इंजिनीअरिंग, रिटेल, आयटी, हॉस्पिटॅलिटी व एफ अॅंड बी, व्यापार व वाणिज्य या क्षेत्रांमध्ये एक अनोखा मार्ग तयार केला आहे. या उद्योगांमध्ये विविध उपक्रम राबवून नवी उंची गाठण्याचा त्यांचा लौकिक आहे.
सह-संस्थापक, संचालक आणि उद्यमी भांडवलदार या भूमिकांमधून पटेल यांनी निलांबर समूह, अॅड्रोइट इन्जिमॅक प्रा. लि., हयात प्लेस वडोदरा यांसारखे उपक्रम विकसित करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. डब्ल्लूएफसी व फॅन्टसी आखाडा यांसारख्या स्टार्टअप्ससाठी ते आधारस्तंभ ठरले आहेत.
अर्जुन पुरस्कार विजेते गौरव गिल हे मोटरस्पोर्ट आयकॉन आहेत. त्यांची ही कारकीर्द दोन दशकांहून अधिक कालावधीची आहे. २००० साली आयएनआरसी सीझनमधील पदार्पणातील कामगिरी, २००४ व २००६ मधील इंडियन फॉर्म्युला रोलॉन आणि मारुती रेसिंग चॅम्पियनशिपमध्ये सलग दोन विजय आणि इंडियन नॅशनल रॅली चॅम्पियनशिपमध्ये सात विजय अशी त्यांची गौरवशाली कामगिरी आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर गिल यांनी तीनवेळा आशिया पॅसिफिक रॅली चॅम्पियनशिप पटकावली आहे. पदार्पणाच्या वर्ल्ड रॅली चॅम्पियनशिपमध्ये त्यांनी ११ टप्पे जिंकले होते.
या नवीन उपक्रमाची माहिती देताना ध्रुमिल पटेल म्हणाले, “गुजरात ट्रेलब्लेझर्ससह सीएट इंडियन सुपरक्रॉस रेसिंग लीगमध्ये सामील होणे ही एक उत्साहवर्धक गोष्ट आहे. लीगचा नाविन्यपूर्ण दृष्टिकोन हा माझ्या उद्योजकतेच्या परंपरेला साजेसा आहे आणि सुपरक्रॉस रेसिंगच्या जगतात मी माझी ऊर्जा आणण्यास उत्सुक आहे. गुजरात ट्रेलब्लेझर्सच्या माध्यमातून, मी उत्कृष्टतेची आवड जपण्याचे आणि उच्च स्तरावर स्पर्धा करणारा एक मजबूत संघ तयार करण्याचे ध्येय बाळगले आहे.”
नव्या संघात सामील होण्याविषयी उत्सुकता व्यक्त करताना गौरव गिल म्हणाले, “सुपरक्रॉस रेसिंगच्या क्षेत्रात प्रवेश करताना मला खूप आनंद होत आहे. एक रेसर म्हणून माझ्यासाठी हा खूप महत्त्वाचा उपक्रम आहे. मोटरस्पोर्ट्सबद्दलची माझी आवड लक्षात घेता, अशा नवीन उपक्रमात सामील होण्याच्या संधीची मी आतुरतेने वाट पाहत होतो. एक उत्कृष्ट संघ स्थापन करण्याबद्दल मी खरोखर उत्साहित आहे. आनंददायक अनुभवांनी भरलेल्या हंगामाची मी अपेक्षा बाळगतो.”
गुजरात ट्रेलब्लेझर्सच्या समावेशाचे स्वागत करताना सुपरक्रॉस इंडिया प्रा. लि.चे सह-संस्थापक आणि संचालक वीर पटेल म्हणाले, “ध्रुमिल पटेल आणि गुजरात ट्रेलब्लेझर्स यांचे आम्ही स्वागत करीत आहोत. सीएट इंडियन सुपरक्रॉस रेसिंग लीगच्या डायनॅमिक फॅब्रिकमध्ये त्यांना सामावून घेताना आम्ही आनंदित झालो आहोत. पटेल यांचा प्रगतीशील दृष्टीकोन आणि त्यांची वैविध्यपूर्ण कौशल्ये ही आमच्या लीगच्या मुख्य मूल्यांशी सहजपणे जुळतात. त्या अनुषंगाने त्यांच्यासोबत काम करण्याची संधी आम्हाला मिळाली, हा क्षण फार महत्त्वाचा आहे. पटेल यांच्या पाठिंब्यामध्ये आम्हाला एक सखोल मूल्याचा स्रोत आढळला आहे, जो या लीगचे महत्त्व वाढवतोच, त्याशिवाय भारतातील मोटरस्पोर्ट्स क्षेत्राला पुनर्परिभाषित करण्याच्या आमच्या सामूहिक महत्त्वाकांक्षेमध्ये मोलाची भूमिकाही बजावतो.”
‘एफएमएससीआय‘च्या सुपरक्रॉस रेसिंग कमिशनचे अध्यक्ष सुजित कुमार याप्रसंगी म्हणाले, “गुजरात ट्रेलब्लेझर्सच्या समावेशामुळे लीगच्या स्पर्धेमध्ये नवीन पैलूंची भर पडली आहे. पटेल यांनी दाखवलेली उत्कृष्टतेची बांधिलकी, त्यांचा उल्लेखनीय उद्योजकीय प्रवास या गोष्टी प्रेरणादायी आहेत. सुपरक्रॉस रेसिंगच्या क्षेत्रात गुजरात ट्रेलब्लेझर्स आणि पटेल यांच्या भरीव योगदानाची आम्ही अपेक्षा करतो.”
ध्रुमिल पटेल यांच्याविषयी :
ध्रुमिल पटेल हे एक गतिमान उद्योजक आणि दूरदर्शी म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांनी बिट्स पिलानीमधून पदवी घेतली आहे, तर पर्ड्यू युनिव्हर्सिटी आणि हार्वर्ड येथूनही शिक्षण घेतले आहे. रिअल इस्टेट, हेवी इंजिनीअरिंग, रिटेल, आयटी, हॉस्पिटॅलिटी व एफ अॅंड बी आणि व्यापार व वाणिज्य अशा अनेक उद्योगांमध्ये ते कार्यरत आहेत. मायप्रॉप प्रॉपर्टी मॅनेजमेंट सर्व्हिसेसचे सह-संस्थापक आणि निलांबर ग्रुपचे संचालक म्हणून त्यांनी नाविन्याचा वारसा निर्माण केला आहे. वडोदऱ्यातील हयात प्लेस या हॉटेलचे सह-मालक आणि विकसक या नात्याने त्यांनी जागतिक दर्जाच्या आदरातिथ्य क्षेत्राविषयी आपली कटिबद्धता व्यक्त केली आहे.
आपल्या या उद्योगांच्या पलिकडे जाऊन ध्रुमिल पटेल यांनी ‘फँटसी आखाडा‘ आणि डब्ल्यूएफसी यांसारख्या स्टार्टअप्सना सहाय्य केले, यातून त्यांची उद्यम भांडवलदार व मार्गदर्शक ही भूमिका अधोरेखित होते. ती व्यवसायातील उत्कृष्टता वाढवते आणि भविष्यातील नेत्यांना प्रेरणा देते.
गौरव गिल यांच्याविषयी :
गौरव गिल हे ल्लेखनीय ट्रॅक रेकॉर्ड असलेले भारतीय मोटरस्पोर्ट आयकॉन म्हणून प्रसिद्ध आहेत. २०१९ त्यांना राष्ट्रपतींच्या हस्ते प्रतिष्ठित अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले व हा सन्मान मिळवणारे ते पहिले मोटरस्पोर्ट अॅथलीट ठरले. हा सर्वांसाठीच एक ऐतिहासिक क्षण होता. एशिया पॅसिफिक रॅली चॅम्पियनशिप स्पर्धांमध्ये तीनदा विजेतेपद मिळवण्याचा पराक्रम त्यांनी केला आहे. त्यामुळे या क्रीडाप्रकारात एक अतुलनीय शक्ती म्हणून त्याचे स्थान मजबूत आहे. याव्यतिरिक्त, या प्रतिष्ठित लीगमधील एकमेव भारतीय ड्रायव्हर म्हणून २०१८मध्ये वर्ल्ड रॅली चॅम्पियनशिपमध्ये (डब्ल्यूआरसी) प्रवेश करून त्यांनी इतिहासाच्या पानांवर आपले नाव कोरले. गौरव गिल यांनी ८०हून अधिक आंतरराष्ट्रीय रॅलींमध्ये भाग घेतला असून त्यांचा वारसा ट्रॅकवर आणि भारतीय मोटरस्पोर्टच्या इतिहासाच्या पानांवर पुनःपुन्हा प्रत्ययास येत असतो.
प्रवर्तकांविषयी:
टीम सुपरक्रॉस इंडिया (एसएक्सआय) ही सीएट इंडियन सुपरक्रॉस रेसिंग लीगची मूळ कंपनी आहे. माजी आंतरराष्ट्रीय रेसर वीर पटेल (दोन वेळा राष्ट्रीय एसएक्स चॅम्पियन), ईशान लोखंडे आणि आश्विन लोखंडे यांच्या नेतृत्वाखाली ही कंपनी एका महत्त्वपूर्ण उपक्रमाचे आयोजन करीत आहे. या तिघांनी आपापला विस्तृत वैयक्तिक अनुभव आणि खेळाबद्दलची अतुलनीय आवड या बाबी लक्षात घेऊन लीगची काळजीपूर्वक उभारणी केली आहे. ही लीग आता जागतिक स्तरावर सुपरक्रॉस रेसिंगमध्ये उतरण्यास जोमाने सज्ज आहे. या खेळाबद्दलची सखोल जाण आणि उत्कृष्टतेसाठीचे अथक प्रयत्न यांतून ते सुपरक्रॉसच्या नवीन युगाचा मार्ग मोकळा करत आहेत. यातून जगभरातील प्रेक्षक लीगकडे आकर्षित होतील.