इंडियन वॉटर वर्क्स असोसिएशनची ५५ वी वार्षिक परिषद २० जानेवारीपासून

228

पुणे, २४ डिसेंबर २०२२  : इंडियन वॉटर वर्क्स असोसिएशनचे (आयवा) तीन दिवसीय ५५ वी अखिल भारतीय वार्षिक परिषद २० ते २२ जानेवारी या कालावधीत हडपसर येथील मेस्से ग्लोबल (लक्ष्मी लॉन्स) पुणे येथे होणार आहे. ‘शाश्वत पाणी पुरवठा व सार्वजनिक आरोग्य – सर्वांसाठीची उपलबद्धता’ अशी यंदाच्या परिषदेची संकल्पना आहे,” अशी माहिती संयोजन समिती अध्यक्ष, ‘आयवा’चे उपाध्यक्ष व महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे मुख्य अभियंता सुभाष भुजबळ यांनी पत्रकार परिषदेत दिली.

पत्रकार भवन येथे झालेल्या पत्रकार परिषदेवेळी संयोजन समिती उपाध्यक्ष, ‘आयवा’चे राष्ट्रीय सरसचिव डॉ. डी. बी. पानसे, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे अधीक्षक अभियंता वैशाली आवटे, निवृत्त अभियंता के. एन. पाटे, शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाचे विभागप्रमुख पराग सदगीर, निवृत्त अधिकारी वसंत शिंदे, पी. यु. माळी, आंटद राजेंद्र, कीर्तिकुमार गुरव, दिलीप पंडित, दीपक म्हस्के आदी उपस्थित होते. यावेळी परिषदेच्या माहिती पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले.

सुभाष भुजबळ म्हणाले, “इंडियन वॉटर वर्क्स असोसिएशन देशातील ३६ केंद्रांद्वारे पाणी पुरवठा व सार्वजनिक आरोग्य विभागाशी संबधित १२ हजार व्यक्तींच्या माध्यमातून शहरी व ग्रामीण, औद्योगिक व कृषी, जलशुद्धीकरण यावर काम करत आहे. पाणी पुरवठा व जलस्वच्छता यावर संस्था अद्ययावत तंत्रज्ञान, माहिती पुस्तिका, मार्गदर्शक सूचना आदी माध्यमातून प्रसार व जागृती करत आहे. पाणी व संबंधित क्षेत्राशी निगडित व्यावसायिक, तंत्रज्ञ, सल्लागार, यांना एकाच व्यासपीठावर चर्चा व विचारमंथन तसेच तंत्रज्ञानाची देवाणघेवाण करून समस्यांचे निराकरण, दूरगामी परिणाम साधणाऱ्या उपायोजना सुचविण्यासाठी ही वार्षिक परिषद महत्वपूर्ण असते.”

“या परिषदेत ‘हर घर जल : आव्हाने व उपाय’, ‘ग्रामीण व शहरी भागासाठी चोवीस तास पाणीपुरवठा’, शहरी व ग्रामीण भागातील सांडपाणी नियोजन’, मानवी विष्ठेचे नियोजन/व्यवस्थापन’, ‘जलशुद्धीकरण व मैलापाणी शुद्धीकरण’, ‘यंत्रणांचे संचलन व देखभाल’, ‘जलस्रोतांचे व्यवस्थापन’ आदी विषयांवर विचारमंथन होईल. यासह ‘जलजीवन अभियान’ व ‘अमृत’ ही विशेष सत्रे व युरोप, जपान आणि ब्रिटन येथील तज्ज्ञांचे ‘संशोधन व विकास तंत्रज्ञानाचे आदानप्रदान’वर आंतरराष्ट्रीय चर्चासत्र होणार आहे. तरुणाईसाठी पाणी क्षेत्राशी निगडित पोस्टर स्पर्धा घेण्यात आली आहे. तज्ज्ञ व अनुभवी व्यक्तींचे शोधनिबंध सादर होणार आहेत. अत्याधुनिक यंत्रे, उपकरणे व तांत्रिक माहिती असलेल्या १२५ स्टॉल्सचे प्रदर्शन असणार आहे.”

“भारतासह परदेशातून १००० पेक्षा अधिक प्रतिनिधी यात भाग घेतील. राज्याचे उपमुख्यमंत्री, पाणीपुरवठा मंत्री यांच्यासह पुण्याचे पालकमंत्री, प्रशासनातील विविध अधिकारी, तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवरील तज्ज्ञ व्यक्ती या परिषदेला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत,” असे डॉ. डी. बी. पानसे यांनी सांगितले.