आरोग्यदायी घरासाठी ‘पेस्ट कंट्रोल’; जनजागृती गरजेची : विकास पाटील

53
पुणे : “घरातील झुरळ, पाल, डास, ढेकूण, माशी यासह अन्य कीटकांना हद्दपार करून आरोग्य चांगले राहण्यासाठी पेस्ट कंट्रोल गरजेचे आहे. बदलत्या काळात पेस्ट कंट्रोल अधिक सुरक्षित व आरोग्यदायी होत आहे. याबाबत जनजागृती, तसेच पेस्ट कंट्रोल करताना सुरक्षेची काळजी घ्यायला हवी,” असे मत राज्याच्या कृषी आयुक्तालयातील निविष्ठा व गुणनियंत्रण विभागाचे संचालक विकास पाटील यांनी व्यक्त केले.
इंडियन पेस्ट कंट्रोल असोसिएशनतर्फे (आयपीसीए) आयोजित दोन दिवसीय तांत्रिक प्रशिक्षण वर्गात पाटील बोलत होते. पीवायसी जिमखानामध्ये झालेल्या कार्यक्रमात कृषी अधिकारी गणेश घोरपडे, ‘आयपीसीए’चे उपाध्यक्ष गोपी नायर, वरिष्ठ सदस्य गुरुप्रसाद आगवणे, खजिनदार अभय शहाणे, युपीएलचे सेल्स हेड कानिफनाथ माचे, ‘इनवु’चे सेल्स हेड उमेश घरत आदी उपस्थित होते. ४० पेक्षा अधिक कामगार या प्रशिक्षण वर्गात सहभागी झाले होते.
विकास पाटील म्हणाले, “शहरीकरणाचा वेग वाढला असून, पेस्ट कंट्रोलचा उपयोग गरजेचा बनला आहे. घरात कीटकनाशक वापरताना पेस्ट कंट्रोल करणाऱ्या कर्मचारी आणि घरातील व्यक्तींनी नेमकी कशी काळजी घ्यावी याबाबत अशा प्रशिक्षण वर्गातून माहिती मिळेल. कृषी विभागामार्फत कीटकनाशकांच्या वापराबाबत नियमितपणे जागृती केली जाते.”
गणेश घोरपडे म्हणाले, “पेस्टीसाईडचा योग्य वापर व्हावा, त्याचे दुष्परिणाम टाळण्यासाठी प्रशिक्षण महत्वाचे आहे. पेस्ट कंट्रोल करणाऱ्या कर्मचाऱ्यांना या प्रशिक्षणाचा चांगला परिणाम होईल. कौशल्य विकासाला यातून चालना मिळेल.”
पेस्ट कंट्रोल करणाऱ्या कामगारांना प्रशिक्षित करण्यासाठी हे प्रशिक्षण घेतले जाते. वेगवेगळ्या प्रक्रियेची माहिती, गुणवत्ता, पेस्ट कंट्रोलच्या पद्धती यावर विविध तज्ज्ञ मार्गदर्शन करत आहेत, ‘आयपीसीए’ गोपी नायर यांनी प्रास्ताविकात सांगितले. आभार गुरुप्रसाद आगवणे यांनी मानले.