‘आपलं पुणे सायक्लोथॉन’ सीझन२ २६ फेब्रुवारी रोजी

85

पुणे, ८ जानेवारी २०२३ : पुणे शहराची सायकलींचे शहर अशी ओळख जपत भारतातील आघाडीची राष्ट्रीय स्तरावर मॅरेथॉन, ट्रायथलॉन्स व सायक्लोथॉनस आयोजित करणारी क्रीडा संयोजक संस्था चॅम्प एन्ड्युरन्स ने पुणेकरांना सायकलच्या पेडल्सवर आणण्यासाठी ‘आपलं पुणे सायक्लोथॉन’चे आयोजन केले आहे. पुणे सायक्लोथॉनचे यंदाचे दुसरे वर्ष असून फिनोलेक्स पाईप्स च्या सयुंक्त विद्यमाने येत्या २६ फेब्रुवारी रोजी हा सोहळा पार पडणार आहे.

१०, २५, ५० व १०० अशा ४ अंतरांसाठी हि स्पर्धा असणार आहे. १० किलोमीटर अंतराचे नाव जॉय राईड, स्त्रियांच्या २५ किलोमीटर अंतरासाठी पिंक पेडलिंग. पुरुषांसाठी ३ वेगवेगळे २५, ५० व १०० किलोमीटरचे पल्ले असणार आहेत. या कार्यक्रमासाठी रुपये ९९९ इतके शुल्क असणार आहे.

प्रत्येक स्पर्धकास सायकलिंग जर्सी, स्लिंग बॅग, आकर्षक बक्षिसे व स्पर्धेदरम्यान हायड्रेशन सपोर्ट मिळणार आहे तसेच यशस्वीपणे अंतर पार करणाऱ्या स्पर्धकांना फिनिशर्स मेडल्स सुद्धा मिळणार आहेत. १० किलोमीटर अंतरांव्यतिरिक्त इतर सर्व स्पर्धकांना कस्टमाइज्ड BIB आणि टाईमिंग चिप देण्याचेही संयोजकांनी ठरवले आहे.www.champendurance.com या संकेतस्थळावर जाऊन नोंदणी करता येणार आहे.

याविषयी बोलताना चॅम्प एन्ड्युरन्सच्या ऑपरेशन्सचे नेतृत्व करणारे श्री रवींद्र वाणी म्हणाले, ““पुण्याची ‘सायकलींचे शहर’ हि ओळख परत आणण्याचा आमचा मानस आहे तसेच सायकलिंग ला रोजच्या वापरात आणण्याच्या दृष्टीनेही हे एक पाऊल आहे कारण सायकल घेऊन मेट्रोतून प्रवास करता येत असल्याने दूरच्या ठिकाणी जाणेही सोयीस्कर बानू शकते. सध्या व्यायाम म्हणून सायकलिंग करणारा वर्ग वगळता केवळ विद्यार्थी, पेपरवाले, दूधवाले, पोस्टमन, किरकोळ विक्रेते व दुचाकी न परवडणारे लोकच सायकल चालवताना दिसतात. विविध स्तरांतील लोकांनी सर्वांगसुंदर व्यायामप्रकार व प्रदूषण रोखण्याचा एक उपाय म्हणून पुन्हा सायकलिंग कडे वळावे असे आम्हाला वाटते.”

“कित्येक प्रगत देशांमध्ये मोटारी व गाड्या घेण्याची ऐपत असणारे लोकही आवर्जून सायकल वापरतात हे आपल्याला माहित आहे,” असे विधान या वेळी आय पी एस व मानद रेस दिग्दर्शक श्री. कृष्ण प्रकाश म्हणाले.