आनंद भांबुरकर यांची “आपला गणपती आपणच रंगवू” कार्यशाळा

36
Ganpati With Anand Bhamburkar

पुणे : पेण येथील प्रभात कला मंदिर चे श्री. आनंद देवधर यांच्याकडे गेली तीन पिढ्यांमध्ये पारंपरिक पद्धतीने जी गणपती रंगकामाची परंपरा सांभाळली जाते त्या परंपरेनुसार रंगकाम शिकवण्याचा प्रयत्न पुण्यातील आनंद भांबुरकर करीत आहेत. काळाच्या ओघात ही कला लुप्त न होता, हा कलेचा वारसा पुढच्या पिढीपर्यंत कसा पोहोचवता येईल याची काळजी घेत आहेत. त्यांनी आत्तापर्यंत वेगवेगळ्या वयोगटातील अनेक कला प्रेमींना ही कला शिकवली आहे. आतापर्यंत मिळालेल्या प्रतिसादावरून त्यांचे हे काम सर्व वयोगटातील लोकांना मनापासून आवडत आहे. या सगळ्या गोष्टी शिकवल्याबद्दल आनंद भांबुरकर प्रभात कला मंदिरचे श्री. आनंद देवधर यांचे शतशः ऋणी आहोत असं मनापासून सांगतात.

पुण्यातील लोकमान्य नगर तेजोमय कला मंदिर येथे श्री. आनंद भांबुरकर यांच्या ”आपला गणपती आपणच रंगवू” या कार्यशाळेचे आयोजन केले गेले. या वर्षातील हि पाचवी कार्यशाळा आयोजित करण्यात आली. या कार्यशाळेत लहानांबरोबर मोठ्यांनीही आनंदाने सहभाग नोंदवला.

या कार्यशाळेविषयी बोलताना श्री. आनंद भांबूरकरांनी सांगितले की, प्रथम गणपतीला बॉडी कलर द्यावा लागतो. हा कलर देताना बाजारात मिळणारे तयार कलर न घेता पारंपारिक पद्धतीने चायना क्ले, सुका पांढरा व नारंगी (ऑरेंज) कलर, डिंक दोन दिवस पाण्यात भिजवून मुरल्यानंतर त्याचा पातळ थर ब्रशने गणपतीच्या मूर्तीला दिला जातो. हा कलर सुकल्यानंतर हातांना थोडासा खरखरीत लागतो.

त्यानंतर कॉटनच्या मऊ कपड्याने मूर्ती घासून मूर्तीला चमक आणली जाते यास ‘झील’ करणे असेही म्हणतात. या पद्धतीत किंवा प्रोसेसमध्ये मूर्तीचा खरखरीत पणा निघून जातो व मूर्ती चमकायला लागते (नवीन पद्धतीत तयार प्लास्टिक पेंट किंवा अभ्रकाने अशा प्रकारची चमक निर्माण केली जाते परंतु रंगातला सौम्यपणा यांनी नष्ट होतो). ही झिलाई फक्त बॉडीला केली जाते. याविषयी बोलताना भांबुरकर म्हणाले कि, खुद्द पेणमध्ये पाच ते दहा टक्के गणपती हे या पद्धतीने म्हणजेच पारंपरिक पद्धतीने रंगवले जातात जिथे हाताने सर्व काम केले जाते. झिलाई चे काम काळजीपूर्वक होते. झिलाई च्या कामाला लागणारा वेळ आणि कलर डिंक व चायना क्ले व्यवस्थित एकत्र न झाल्यास नंतर त्याची पडणारी पावडर यामुळेही कदाचित ही कला लुप्त होत चालली आहे. बाजारपेठेच्या व्यावसायिकरणामुळे ही झिलाईची कला संपत चालली आहे. याविषयी त्यांनी खंत व्यक्त केली. ही झिलाईची कला पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्याची त्यांची इच्छा आहे असेही ते पुढे म्हणाले.

झिलाई चे काम झाल्यानंतर कोरडा नारंगी (ऑरेंज) कलर ब्रशवर घेऊन सर्व खाचांमध्ये शेडिंग केले जाते. हे झीलाई चे काम आणि नारंगी कलर चे शेडिंग पेण च्या गणपतीचं वेगळेपण आहे असेही भांबुरकरांनी विशेष नमूद केले. अशाप्रकारे रंगवलेल्या गणपतीचे सौंदर्य समयीच्या मंद प्रकाशात मनोहारी आणि विलोभनीय दिसते. याच कारणामुळे आनंद भांबुरकर या पद्धतीच्या कामाकडे आकर्षित झाले.

कोरड्या नारंगी (ऑरेंज) रंगाचे शेडिंग झाल्यानंतर कद किंवा सोवळे व उपरणे याला बेस कलर दिला जातो. या बेस कलरला वेलवेट इफेक्ट देण्यासाठी उपरण्याच्या किंवा सोवळ्याच्या खाचेत जवसाचे तेल ब्रशने दिले जाते. ही सुध्दा पेणच्या देवधरांची खासियत आहे. याने वस्त्राला चमक व शेडिंग येते. वस्त्राच्या घडीमधली ‘डार्क शेड’ याने अचूक दाखविता येते. 

कोरडा कलर देताना एक हात वाळल्यानंतर, दुसरा हात देताना त्या रंगाची मजा समजते. पोस्टर रेड कलर मध्ये थोडासा क्रीमजन रेड कलर एकत्र करून गणपतीच्या नखांना कलर दिला जातो.

गणपतीचे केस, मुकुट आणि रेखीव असे डोळे रंगवले जातात. सोनेरी कलर ने उपरण्यावर बेलबुटी काढली जाते. गणपतीच्या हातावर ओम लिहिला जातो आणि अशा तऱ्हेने हा गणपती पूर्णत्वास पोहोचतो.

Ganpati

 

या गणपतीकडे पाहता पाहता आणि त्याला रंग देता देता रंगवणारा ओम गं गणपतये नमः यात अखंड न्हावून निघतो. तन्मयतेने गणपती तत्वाशी एकरूप होतो आणि पूर्ण झालेल्या गणपतीकडे पाहता पाहता तो सर्व काही विसरतो. आपणच रंगवलेल्या मूर्तीच्या डोळ्यांकडे पाहताना तो कधी त्या मूर्तीशी एकरूप होतो हे त्यालाही कळत नाही. इतकी सुंदर मूर्ती आपण रंगवली आहे यावर स्वतःचा विश्वासच बसत नाही.

प्रत्येकाला वाटत असतं की आपल्या घरच्या बाप्पासाठी आपण काहीतरी करावं पण जेव्हा आपण आपल्या हाताने आपला गणपती रंगवतो तेव्हा त्याचं समाधान अवर्णनीय आहे. प्रत्येक क्षणी हा आनंद द्विगुणीत करणार आहे. या आनंदाला खऱ्या अर्थाने साज चढवण्याचं काम आनंद भांबुरकरांनी केलय.