आंतरशालेय हॉकी सेंट पॅट्रिक प्रशालेची विजयी सलामी

70
पुणे, १८ नोव्हेंबर २०२२ :  सेंट पॅट्रिक प्रशाला संघाने आजपासून येथे सुरु झालेल्या दुसऱ्या फादर शॉक स्मृती आंतरशालेय हॉकी स्पर्धेत आपले दोन्ही सामने जिंकून झकास सुरुवात केली. लॉयला प्रशालेच्या माजी विद्यार्थी संघटना आणि लॉयला प्रशालेच्या वतीने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
नेहरुनगर येथे मेजर ध्यानचंद हॉकी मैदानावर शुक्रवारपासून सुरु झालेल्या स्पर्धेत पहिल्या सामन्यात कर्नल भगत प्रशाला, खडकी आणि मॉडर्न प्रशाला, शिवाजीनगर यांच्यातील १७ वर्षांखालील गटातील सामना गोलशू्न्य बरोबरीत सुटला. त्यानंतर झालेल्या दोन सामन्यात सेंट पॅट्रिक प्रशाला संघाने विजय मिळविले.
सेंट पॅट्रिक प्रशाला संघाने प्रथम १७ वर्षांखालील गटात कर्नल भगत प्रशाला संघाचा ३-० असा पराभव केला. आजच्या दिवसातील हा सर्वांत मोठा विजय ठरला. कर्णधार आदित्य दरवडेने २१ आणि ४८व्या मिनिटाला दोन गोल केले. तिसरा गोल रॉन नायडूने ३७व्या मिनिटाला केला.
सेंट पॅट्रिक प्रशाला संघाने नंतर १४ वर्षांखालील गटातूनही विजयी सुरुवात करताना दिल्ली पब्लिक स्कूल, उंड्री संघाचा २-० असा पराभव केला. सामन्याच्या सहाव्या मिनिटाला कर्णधारक शशांक गोरेने आघाडी मिळविणारा गोल केला. त्यानंतर शौर्य मेंगे याने ३७व्याम मिनिटाला संघाची आघाडी वाढवणारा गोल केला.
लॉयला प्रशालाचे प्रिन्सिपॉल फादर एस. जे. अनिष यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन झाले. या वेळी माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष मनोज वाळवेकर, संयोजन समितीचे कार्याध्यक्ष नितीन जोशी उपस्थित होते.
निकाल –
 
१४ वर्षाखालील, गट ब : सेंट पॅट्रिक हायस्कूल: 2 (शशांक गोरे ६वे; शौर्य मेंगे ३७वे मिनिट) वि.वि. दिल्ली पब्लिक स्कूल, उंड्री: ० मध्यंतर १-०
 
१७ वर्षांखालील गट-ड: कर्नल भगत हायस्कूल ० अनिर्णित वि.  मॉडर्न हायस्कूल, शिवाजीनगर ०
१७ वर्षाखालील, पूल-ड: सेंट पॅट्रिक्स हायस्कूल: ३ (आदित्य दरवडे ३१वे, ४८वे; रॉन नायडू ३७वे) वि.वि. कर्नल भगत हायस्कूल: ०. मध्यंतर ०-०